खलिस्तानी मुक्ती आघाडीचा अतिरेकी देवींदरपाल सिंग भुल्लर हा सध्या आजारी असून त्यामुळे त्याच्या फाशीच्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही. याखेरीज, याच मुद्दय़ावर त्याच्या दयेचा अर्जही प्रलंबित आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास दिले.
फाशीच्या शिक्षा झालेल्या आरोपीने केलेल्या दयेच्या अर्जावर केंद्र सरकारने शक्य तितक्या लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना सरन्यायाधीश पी. सतशिवम् यांच्या खंडपीठाने सरकारला केली असून संबंधित निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला दोन आठवडय़ांचा अवधी दिला आहे. यापुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार आहे. यामुळे भुल्लर याला आता दयेचा अर्ज नव्याने सादर करण्याची संधी मिळणार आहे. मानवतावादी तत्त्वे आणि नैसर्गिक न्यायास अनुसरून आपण भुल्लरच्या दयेचा अर्ज फेटाळू शकत नाही, असे स्पष्ट करून त्याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस दिल्लीच्या नायब राज्यपालांनी आपला कौल दिला नव्हता, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी न्यायालयास दिली.
आपल्या पतीची प्रकृती मानसिकदृष्टय़ा ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तसेच त्याच्या दयेच्या अर्जावर विलंब झालेला असल्यामुळे त्याला फाशी देण्यात येऊ नये, अशी याचिका भुल्लरची पत्नी नवनीत कौर हिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.