दरवाजे बसवण्याच्या मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र
सरदार सरोवर धरणावर दरवाजे बसवण्याबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकार राज्याच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत याप्रकरणी केंद्र सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.
१० हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन प्रकल्पाच्या कोनशिला समारंभानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली.  या प्रकल्पामुळे सौराष्ट्रातील ११५ धरणे आणि जलाशयांना नर्मदेचे पाणी उपलब्ध होणार आहे.
मोदी पुढे म्हणाले की, चाळीस  वर्षांपूर्वी पंडित नेहरूंनी नर्मदा प्रकल्पाची कोनशिला बसवली. मात्र केंद्रातील काँग्रेस सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यामुळेच आजही राज्य सरकार या धरणाला दरवाजे लावण्याबाबत लढा देत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
नर्मदा धरणावर दरवाजे बसवण्याची परवानगी मिळावी यासाठी आपण अनेकदा पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून नेहमीच थंड प्रतिसाद मिळाला. यामुळे आमच्यात संतापाची भावना पसरल्याचे मोदी म्हणाले.
धरणाचे काम अर्धवट असल्यामुळे नर्मदा नदीतील सुमारे ६० टक्के  पाणी वाया जात असून दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले तर वाया जाणारे पाणी वाचवता येईल, असे ते म्हणाले.
काँग्रेसला चहा विक्रेत्याबाबत नाराजी आहे. मात्र काँग्रेसने राजकारण आपल्या जागी ठेवावे आणि सौराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भूमिका घ्यावी, असा टोलाही मोदी यांनी काँग्रेसला लगावला.
देशाला अर्थतज्ज्ञ असणारे पंतप्रधान तसेच अनुभवी विद्वान अर्थमंत्री लाभले आहेत. मात्र तरीही देशाच्या कृषी विकास दोन ते तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. तर दुसरीकडे नेहमीच पाण्याचा तुटवडा भासणाऱ्या गुजरातमध्ये हाच कृषिविकास दर १० टक्क्य़ांपर्यंत वाढल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.