भारतीय सागरी हद्दीत संशयास्पदरीत्या वावरणारे एक अमेरिकी जहाज अडकवून ठेवण्यात आले असून, त्यासंदर्भात सरकार अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. खोल समुद्रातील चाचेगिरीस रोखण्यासाठी या जहाजातून खासगी संस्थांना शस्त्रपुरवठा होत असल्याचा संशय आहे.
तुतिकोरीन येथे अडकवून ठेवण्यात आलेल्या ‘एमव्ही सीमन गार्ड ओहिओ’ या जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये आठ भारतीयांचाही समावेश आहे. शनिवारी तुतिकोरीनपासून १५ नॉटिकल मैलांवर (सागरी अंतर) तटरक्षक दलाला या जहाजाची खबर लागल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली. बेकायदेशीररीत्या शस्त्रे वाहून नेल्याबद्दल १० कर्मचाऱ्यांविरोधात प्राथमिक आरोपपत्रही (एफआयआर) दाखल करण्यात आले आहे.
याआधी मलाक्का आणि आता आखातातील समुद्रात मोठय़ा प्रमाणावर चाचेगिरी होत असल्याचा अंदाज आहे. या चाचेगिरीस पायबंद घालण्यासाठी जहाजाच्या रूपातील तरत्या शस्त्रागाराची आवश्यकता भासते आणि तुतिकोरीन येथे अडकवून ठेवण्यात आलेले जहाज अशाच स्वरूपाचे असावे, असा संशय राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे उपसल्लागार नेहचाल संधू यांनी व्यक्त केला.