राहुल गांधी यांचे केंद्राला आवाहन; काँग्रेसची ‘श्वेतपत्रिका’ प्रकाशित

नवी दिल्ली : करोना आपत्तीमध्ये केंद्राच्या हाताळणीतील कथित गैरव्यवस्थापनाचा आढावा घेणारी ‘श्वेतपत्रिका’ मंगळवारी काँग्रेसने प्रकाशित केली. ‘हा अहवाल फक्त केंद्राकडे बोट दाखवण्यासाठी नसून चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग ठरू शकेल. केंद्र सरकारने दक्षता घेतली असती तर दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचवता आले असते. विषाणू उत्परिवर्तित होत असून तिसऱ्या लाटेसाठी तरी केंद्राने पूर्वतयारी केली पाहिजे,’’ असे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.

दुसऱ्या लाटेत आप्त गमावलेल्या अनेक कुटुंबांना मी ओळखतो. त्या रुग्णांना वेळेवर प्राणवायू मिळाला असता तर ते वाचले असते. पंतप्रधान मोदींचे अश्रू या कुटुंबीयांचे अश्रू थांबवू शकत नाहीत. दुसऱ्या लाटेचा डॉक्टर-तज्ज्ञांनी दिलेला इशारा मोदींनी गांभीर्याने घेतला नाही, ते पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात मग्न होते. करोनावर मात करण्याआधीच मोदींनी साथरोगाला हरवल्याची शेखी मिरवली, जगाला लस वितरित केल्याचा गवगवा केला. थाळी वाजवणे, दिवे लावणे अशा अनेक क्लृप्त्या करून मोदींनी स्वत:चे ‘मार्केटिंग’ कसे केले हे अवघ्या देशाने पाहिले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

फक्त भारतात खासगी रुग्णालयांत लशींसाठी पैसे मोजावे लागतात, जगात सर्वत्र लस मोफत दिली जाते, असे सांगत राहुल यांनी लसीकरण धोरणावर आक्षेप घेतला. सोमवारी एका दिवसात ८० लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या. या संदर्भात, एकदिवस चांगले काम झाले (लसीकरणाची जास्त संख्या), पण लसीकरण ही प्रक्रिया असून मोहीम म्हणून राबवली पाहिजे.  लशींबाबत शंका असतील तर केंद्राने जनजागृती करून शंभर टक्के लसीकरण करावे. काँग्रेसने कोणत्याही लशीबद्दल शंका घेतलेली नाही. केंद्राने सुरक्षित व विश्वासार्ह लशी अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला चांगले बघवत नाही -भाजप

दुसरी लाट काँग्रेसशासित राज्यांमधून सुरू झाली आणि अधिक तीव्र होती. याच राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी असून देशी बनावटीच्या लशीला विरोध केला गेला, असा तीव्र प्रतिवाद भाजपने केला. देशात चांगले घडत असलेले काँग्रेसला सहन होत नाही, त्याविरोधात लगेच राहुल गांधी  प्रश्नचिन्ह उभे करतात. पंजाबमधील लस घोटाळ्याबाबत राहुल यांनी मौन का बाळगले आहे? असे भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले.

काँग्रेसच्या सूचना, दावे

* काँग्रेसच्या ‘श्वेतपत्रिके’त प्रमुख चार मुद्दय़ांचा समावेश असून पहिल्या दोन लाटांत केंद्र सरकारने केलेल्या कथित चुकांचा ऊहापोह केला आहे. तिसरी लाट अपरिहार्य असून त्यासाठी रुग्णालये, खाटा, औषधे, प्राणवायूचा पुरवठा आदी सुविधांची तयारी करण्याची सूचना केली आहे. करोना हा फक्त साथरोग नसून मोठी आर्थिक-सामाजिक आपत्तीही आहे. छोटे व्यापारी-उद्योजक, गरीब-कनिष्ठ मध्यमवर्गाच्या हाती थेट पैसे देण्याची गरज आहे. केंद्राने प्रत्यक्ष आर्थिक साह्य करणारी योजना राबवावी तसेच करोना नुकसानभरपाई निधी उभारून कर्ता-सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्याची शिफारसही श्वेतपत्रिकेत करण्यात आली आहे.

* केंद्राकडून करोना रुग्णांचे मृत्यू लपवले जात असून किमान ५-६ पटीने ते अधिक असल्याचा दावा राहुल यांनी केला.