बसप नेत्या मायावती यांचे मत

लखनौ : देशात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून गुन्हेगारीला आळा घालतानाच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी बुधवारी व्यक्त केले. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने अलीकडेच देशातील गुन्हेगारीविषयी जी माहिती जाहीर केली आहे ती देशाची प्रतिमा उंचावणारी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची २०१७ या वर्षांसाठीची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून ती एक वर्ष विलंबाने हाती आली आहे. या माहितीनुसार देशात एकूण ३.५९ लाख गुन्हे नोंदले गेले, त्यात लागोपाठ तिसऱ्या वर्षी महिलांविरोधातील गुन्हे वाढले आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्ह्यंची संख्या ५६०११ आहे.

मायावती यांनी सांगितले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने देशातील गुन्हेगारीची आकडेवारी सादर केली असून  प्रसारमाध्यमांनी त्याबाबत मोठय़ा बातम्या दिल्या आहेत. देशात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण हे नक्कीच प्रतिमा उंचावणारे नाही. महिलांविरोधातील गुन्हे लागोपाठ तिसऱ्या वर्षी वाढले आहेत ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती खूपच वाईट असून केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना ही लाजिरवाणी स्थिती आहे. उत्तर प्रदेशातही महिलांविरोधातील गुन्ह्यत मोठी वाढ झाली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था ही देशातील सर्व राज्यांची गुन्हेगारी विषयक आकडेवारी जाहीर करीत असते, पण त्यांच्या या आकडेवारीला आतापर्यंत नेहमीच विलंब होत आला आहे. २०१९ हे वर्ष संपत आले असताना त्यांनी २०१७ या वर्षांतील आकडेवारी जाहीर केली आहे.