News Flash

केंद्राचा मोठा निर्णय! आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची लसीकरण नोंदणी थांबवली

अपात्र लोकांकडून नियमांचं उल्लंघन

(संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील इतर गटातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी केंद्राने पहिल्या फळीतील करोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण नाव नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे आदेश सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. नियमांचा भंग करून काही अपात्र असलेले लोकही करोनाची लस घेत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांची लसीकरण नोंदणीला तात्काळ थांबवावी, असे आदेश केंद्रीय सचिवांनी दिले आहेत. काही अपात्र लाभार्थी नियमांचा भंग करून या श्रेणीतून नोंदणी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे. विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लसीकरण केंद्रांवर अपात्र लोकांची आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे म्हणून नोंदणी केली जात आहे. हा प्रकार म्हणजे ठरवून दिलेल्या नियमावलीचा पूर्णपणे भंग करणारा आहे, असं केंद्रानं पत्रात म्हटलं आहे.

देशात करोना लसीकरणाची सुरूवात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांपासूनच झाली होती. मात्र मागील काही दिवसांत या श्रेणीतून नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोंदणीमध्ये अचानक झालेल्या वाढीनंतर केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. “४५ वर्षांपुढील नागरिकांना को-विन प्रणालीवरून नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ज्या आरोग्य सेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांच्या नावाची लसीकरणासाठी नोंदणी झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर लस देण्यात यावी,” असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 10:21 am

Web Title: centre tells states not to allow fresh registrations of healthcare workers for covid vaccination bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 छत्तीसगडमध्ये चकमकीत  ५ जवान शहीद
2 मंत्री सरमा यांच्यावरील प्रचारबंदीनंतर पोलीस अधीक्षक भावाची बदली
3 ‘भाजपकडून  जातीय कलह’
Just Now!
X