गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या गोहत्या आणि गोमांसबंदीच्या मुद्द्यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मौन सोडले. कोणी काय खावे किंवा खाऊ नये, याबाबत केंद्र सरकार कधीही हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते मंगळवारी मिझोरामधील पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या राजनाथ सिंह मिझोरामच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मिझोरामची राजधानी असलेल्या ऐझॉल शहरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारकडून आठवडी बाजारात भाकड जनावरांच्या विक्रीवर घातलेल्या बंदीचा जोरदार निषेध केला. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याच मुदद्यावरून पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, केंद्र सरकार कोणाच्याही खानपानाच्या सवयींवर निर्बंध लादणार नाही. ईशान्येकडील राज्यांमध्ये गोमांस हा आहारातील प्रमुख घटक असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सातत्याने सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत.

कुणी काय खावं ही ज्याची-त्याची आवड; बीफ बंदीच्या चर्चेला व्यंकय्या नायडूंची ‘फोडणी’

काही दिवसांपूर्वी पशू बाजारात कत्तलीसाठी जनावरांच्या विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यावरून जपला सर्वांनाच शाकाहारी करायचं आहे, अशी टीका होऊ लागली होती. मात्र, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावं, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे. काही लोक प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असे नायडू यांनी म्हटले होते. भाजप सर्वांना शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एका राजकीय पक्षाच्या नेत्याने केला होता. त्यावर वृत्तवाहिनीवर चर्चाही झाली होती. त्यात मी हैदराबादचा प्रदेशाध्यक्ष होतो आणि मी मांसाहारीही आहे, तरीही पक्षाचा अध्यक्ष झालो, असे नायडू यांनी म्हटले होते.

मोदी सरकारच्या गोमांस बंदीविरोधात आठवडाभरात २ भाजप नेत्यांचे राजीनामे