यापुढे ‘झेड’ सुरक्षा; घाबरवण्याचा प्रकार असल्याची लालू यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली आहे. ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एनएसजीची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत फेरआढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तर लालू प्रसाद यादव यांनी हा आपल्याला घाबरविण्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप केला आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेले लालूप्रसाद यादव यांना आता झेड सुरक्षा देण्यात आली असून, त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कमांडो जवानांचे पथक संरक्षणासाठी दिले जाईल. झेड प्लस सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्यांना आता झेड निकषानुसार सुरक्षा देण्यात आली आहे. यादव यांना आता राष्ट्रीय सुरक्षारक्षकांच्या (एनएसजी) ब्लॅक कॅट कमांडोजची सुरक्षा राहणार नाही.

यावर लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. लालू हा काही इतरांसारखा घाबरून शरण जाणारा माणूस नाही. बिहारची जनता माझी सुरक्षा करण्यास समर्थ आहे. परंतू, आपल्या जीवचे काही बरे वाईट झाल्यास त्यास नितिश कुमार आणि मोदी यांचे सरकार जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.

एनएसजी फक्त झेड प्लस सुरक्षा देत असते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या धोक्याचा फेरआढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने लालूंची झेड प्लस सुरक्षा काढली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची झेड प्लस (केंद्रीय राखीव पोलिस दल) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आता त्यांना केवळ राज्य पोलिसांचे संरक्षण राहील. केंद्रीय मंत्री हरिभाई पी. चौधरी यांची सुरक्षा कमी करून ती वाय प्लस करण्यात आली आहे. यात फार संरक्षणासाठी कमी जवान असतात. कोळसा राज्यमंत्री असलेल्या चौधरी यांना ते गृहराज्यमंत्री असताना केंद्रीय सुरक्षा दलांच्या कमांडोजची मोठी सुरक्षा देण्यात आली होती.

सुरक्षा प्रवर्ग

  • झेड प्लस- ५५ सुरक्षा जवान ( दहाहून अधिक एनएसजी कमांडो) व पोलिस
  • झेड- २२ सुरक्षा जवान (४ ते ५ एनएसजी कमांडो) व पोलिस.
  • वाय- ११ सुरक्षा जवान (१ ते २ कमांडो) व पोलिस.
  • एक्स- दोन ते पाच सुरक्षा जवान, कमांडो नाहीत, लष्करी पोलिस संरक्षण.

मोदींना सोलून काढू..

लालू यांची झेड प्लस सुरक्षा काढल्यावरून त्यांचे पुत्र तेजस्वी प्रताप यांची मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. लालू यांच्या खुनाचा कट मोदी सरकारने आखला आहे. त्याना काही झाल्यास मोदी यांची चामडी सोलून काढू, असा इशारा तेजस्वी प्रताप यांनी दिला आहे.