भूसंपादन अध्यादेशाविरोधात ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांच्या येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली. दिल्लीत कोणालाही सक्तीने भूसंपादन करू दिले जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. अण्णांच्या आंदोलनाला केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत व्यासपीठावर जाणार नाही, अशी घोषणा हजारे यांनी केली होती. मात्र केजरीवाल यांच्यासह भाकपचे अतुल अंजन, एमडीएमकेचे वायको व्यासपीठावर होते. केंद्र सरकारने शेतऱ्यांचे हित लक्षात घेतले नसल्याचा आरोप अण्णांनी केला. सरकार हा अध्यादेश मागे घेईपर्यंत हटणार नाही, असा इशारा अण्णांनी दिला. अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येणार असतील तर काय हरकत आहे, अशा शब्दात राजकीय नेत्यांच्या आंदोलनातील सहभागाबाबत अण्णांनी स्पष्ट केले.
‘दिल्लीच्या निकालातून बोध घ्यावा’
अण्णा हजारे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भूसंपादन अध्यादेशाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला. व्यासपीठावर अण्णांनी केजरीवाल यांचे स्वागत केले. तीन वर्षांनंतर पुन्हा दोघे एका व्यासपीठावर आले. केजरीवाल यांनी छोटेखानी भाषणात केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. भूसंपादन विधेयक संमत झाले तर हे सरकार मोठय़ा कंपन्यांचे हस्तक बनेल असा आरोप केला. आम्ही त्याचा विरोध करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मोठय़ा विश्वासाने जनतेने त्यांना सत्ता दिली. मात्र ८ ते ९ महिन्यांतच त्यांच्या धोरणामुळे दिल्लीतील जनतेने धडा शिकवल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. जनविरोधी कायदा करण्याचा सरकारने प्रयत्न केला तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.