पाकिस्तानला दणका देत भारत- अफगाणिस्तान- इराण या देशांमधील व्यापारी संबंध आणखी दृढ होणार असून रविवारी भारतातील गहू अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झाला आहे. इराणच्या चाबहार बंदरमार्गे हा गहू अफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून चाबहार बंदरचा भारताने पहिल्यांदाच वापर केला आहे.

चाबहार बंदरामुळे भारत- अफगाणिस्तान- इराण हे तिन्ही देश जवळ आले आहेत. रविवारी भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतातील गहू अफगाणिस्तानला रवाना झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सोहळा पार पडला. भारतातील ११ लाख टन गहू अफगाणिस्तानला रवाना झाला आहे. भारत- अफगाणिस्तानमधील व्यापार हा पाकिस्तानमार्गे होत होता. मात्र आता इराणमधील चाबहार बंदरमार्गे गहू अफगाणिस्तानात पाठवण्यात येणार आहे. यापुढे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे.  ‘पुढील काही महिन्यांमध्ये भारत अफगाणिस्तानमध्ये लाखो टन गहू निर्यात करणार आहे. दोन्ही देशांच्या विकासासाठी आणि जनहितासाठी आम्ही कटीबद्ध आहोत’, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील विकासकामात भारताने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

चाबहार बंदरचे महत्त्व काय ?
इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेल्या चाबहार बंदरात पाय रोवण्याची संधी मिळाल्याने भारताला या विभागात सामरिक फायदा होणार आहे. चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित केले आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचा आहे. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे. त्यामुळे भारत- इराण – अफगाणिस्तान या तिन्ही देशांसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. चाबहार ते इराणमधील माशादमार्गे युरोप व रशियाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (एनएसटीसी) विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. तो मार्ग तयार झाल्यानंतर भारत ते युरोप समुद्रमार्गाच्या तुलनेत ६० टक्के वेळ आणि ५० टक्के खर्च वाचणार आहे.