अमेरिकेने र्निबध घातलेले असतानाही चीनने अमेरिकेकडून घेतलेल्या ‘इपॉक्सी’ कोटिंगची पाकिस्तानच्या अणू प्रकल्पाला फेरविक्री केल्याबद्दल अमेरिकेने चीनच्या एका कंपनीला तीन दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे.
हुआक्सिंग कन्स्ट्रक्शन कंपनी या चीनमधील अणू उद्योग समूहाने अमेरिकेची परवानगी न घेताच अमेरिकेतील कंपनीची चीनमधील उपकंपनी असलेल्या पीपीजी उद्योग समूहाशी इपॉक्सी कोटिंग विकण्याचा कट रचला, असा आरोप हुआक्सिंग कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
चष्मा-२ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना २००६-०७ मध्ये इपॉक्सी कोटिंगचा पुरवठा करण्यात आला. मात्र अशा प्रकारच्या घटकांची विक्री करण्यासाठी विशेष परवान्याची गरज असते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वीच पीपीजी आणि चीनमधील तिची उपकंपनी असलेल्या पीपीजी पेण्टस ट्रेडिंग (शांघाय) कंपनीला ३.७५ डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.पाकिस्तानच्या अणू प्रकल्पात सदर इपॉक्सी कोटिंग नेण्यात आल्याची जबाबदारी हुआक्सिंगने स्वीकारली असल्याचे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी रोनाल्ड मॅशेन यांनी म्हटले आहे.     

नि:शस्त्रीकरणाबाबत भारताने अमेरिका- रशियाकडून धडा घ्यावा
नि:शस्त्रीकरणाच्या मुद्दय़ावर भारत आणि पाकिस्तानने अमेरिका-रशिया या देशांकडून धडा घ्यावा, कारण अण्वस्र नि:शस्त्रीकरण हे आगामी काळात या देशांसमोर अवघड आव्हान ठरणार असल्याचे अमेरिकेचे माजी मंत्री सॅम नन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने या दोन राष्ट्रांना सल्ला द्यावा असे माझे मत नाही, मात्र दोन्ही देशांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी हा उपयुक्त पर्याय असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले.