२ ऑक्टोबरपर्यंत ठाण मांडण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला पंजाब, हरियाणा, राजस्थानसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर ट्रॅक्टर उभे करून शेतकऱ्यांनी रस्ते अडवल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला.

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या, त्याचबरोबर दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझिपूर सीमा बंद केल्याच्या आणि त्या परिसरातील इंटरनेट सेवा खंडित केल्याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक दिली होती. त्याला उत्तरेकडील राज्यांमधील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत रस्त्यांवर ट्रॅक्टर उभे केले. अनेक टोलनाक्यांवरही ठिय्या देण्यात आला. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-टे्रलर रस्त्यांच्या मधोमध उभे करून केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. पंजाबच्या संगरूर आणि लुधियाना येथे महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

पंजाबमधील १५ जिल्ह्यांमध्ये ३३ ठिकाणी वाहतूक रोखून धरण्यात आली. जय-जवान, जय-किसान आणि किसान एकता झिंदाबाद अशा घोषणा लिहिलेले फलकही शेतकऱ्यांच्या हातात होते.

चंडीगड-झिरकपूर, अमृतसर-पठाणकोट, तर्णतारण-कापूरथळा, फिरोझपूर-फाजिल्का, भटिंडा-चंडीगड, लुधियाना-जालंधर, अंबाला-चंडीगड, अंबाला-हिसार इत्यादी महामार्गांवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पंजाब आणि हरियाणामध्ये तीन तासांचे चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडल्याचा दावा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केला. दोन्ही राज्यांमधील अनेक टोल नाक्यांवरही निदर्शने करण्यात आली. चक्का जामच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि शालेय बसगाड्यांना मात्र वाट देण्यात आली, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी रस्ते अडवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. काही राज्यांत काँग्रेस आणि डाव्या पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी ‘चक्का जाम’मध्ये उतरले होते. महाराष्ट्रात मुंबईसह कराड, कोल्हापूर येथेही आंदोलन करण्यात आले. कराड येथे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला यांच्यासह ४० निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही ताब्यात घेण्यात आले.

कर्नाटकात बंगळुरू, म्हैसुरू, कोलर, कोप्पल, तुमकुरू, मंगळुरू, शिवमोगा आदी ठिकाणी निदर्शने करण्यात आले. काही ठिकाणी आंदोलकांना अटक करण्यात आली. तेलंगणातही अनेक ठिकाणी निदर्शकांची धरपकड करण्यात आली. तमिळनाडूच्या काही भागांतही चक्का जाम करण्यात आले.  दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आंदोलन करण्यात येणार नाही, असे शेतकरी संघटनांनी आधीच जाहीर केले होते.

कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ध्वनिक्षेपकावरून होणारी घोषणाबाजी, घुमणारे निषेध गाण्यांचे सूर, त्याला मिळणारी लोकगाणी आणि लोकसंगीताची साथ, ट्रक-ट्रॅक्टरवर फडकणारा तिरंगा आणि सर्वसामान्य प्रवाशांना करण्यात येणारे सहकार्याचे आवाहन असे दृश्य शनिवारी कुंडली-मानेश्वर-पलवाल (केएमपी) महामार्गावर दिसत होते.

सरकारशी  तडजोड नाही : टिकैत

गाझियाबाद : सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी आपआपल्या घरी परततील. या बाबतीत सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. आम्ही २ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसणार आहोत, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

तोमर यांच्यावर संघनेत्याची टीका

भोपाळ : कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या डोक्यात सत्तेची मग्रुरी भिनली आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते रघुनंदन शर्मा यांनी शनिवारी केली. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात संघाच्या ज्येष्ठ नेत्याने केंद्रीय मंत्र्यावर उघड हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.