राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या पक्षाचे नेतृत्त्व करताना त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यातच अवघ्या दीड वर्षांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने त्यांना पक्ष संघटनेत मोठे बदल करावे लागणार आहेत.

४७ वर्षांच्या राहुल गांधींकडे पक्षाची सूत्रे आल्यावर त्यांना पक्ष संघटनेतील जुन्या, नव्यांचा ताळमेळ साधावा लागेल. काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि नवे चेहरे यांच्यात चांगला समन्वय राखण्याची कठीण जबाबदारी राहुल यांना पार पाडावी लागेल. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राहुल यांच्या कामाची पद्धत फारशी आवडत नाही. मात्र त्यांनाही सोबत घेऊन वाटचाल करण्याची तारेवरची कसरत राहुल यांना करावी लागणार आहे. सोनिया गांधींकडे जवळपास १९ वर्षे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. या काळात दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्या यशस्वी झाल्या. मात्र त्यावेळच्या तुलनेत आताचा भाजप अतिशय भक्कम आहे. त्यातच सत्तेची गणितेदेखील भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाला सावरण्याचे आणि विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्याचे काम त्यांना करावे लागेल.

राहुल गांधी गेल्या ४ वर्षांपासून पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. या कालावधीत त्यांनी पक्षातील घराणेशाही संपवण्याचे प्रयत्न केले. मात्र स्वत: राहुल गांधी यांच्यावरच घराणेशाहीची टीका होत असल्याने यामध्ये त्यांना फारसे यश आलेले नाही. २०१४ मधील लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या पराभवांमुळे आत्मविश्वास गमावलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीत चैतन्य निर्माण करण्याचे काम राहुल गांधींना करावे लागेल.

आता मात्र राहुल गांधींनी गुजरातमध्ये आक्रमक प्रचार करत भाजपसमोर आव्हान उभे केले. त्यामुळेच मोदींच्या होम ग्राऊंडमध्ये केंद्रातील मंत्र्यांची फौज प्रचारासाठी उतरली आहे. याशिवाय पक्षाध्यक्ष अमित शहांनीही गुजरातमध्ये ठाण मांडले आहे. राहुल गांधींना यापुढेही हेच सातत्य कायम राखावे लागेल. त्यांनी गुजरातमध्ये विविध जातींच्या नेत्यांशी यशस्वी चर्चा केली. पुढे भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडी करण्यासाठी त्यांना असेच प्रयत्न करावे लागतील. सत्ता नसल्याने ‘यूपीए’ सरकारच्या काळात सोबत असलेले पक्ष आता काँग्रेसपासून अंतर राखून आहेत. त्यांना भाजपविरोधात एकत्र आणण्याची अवघड कामगिरीदेखील त्यांना करावी लागेल.

लोकसभा निवडणुकीआधी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींची अग्निपरीक्षा असेल. कर्नाटकमधील सत्ता राखण्याचे मोठे आव्हान राहुल यांच्यासमोर असेल. लोकसंख्या आणि आकारमानाचा विचार करता कर्नाटक हे एकमेव राज्य सध्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळे कर्नाटक राखण्याची जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावर आहे. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये भाजपसमोर कडवे आव्हान उभे करण्याची कामगिरीही त्यांना पार पाडावी लागेल.

उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था फारशी चांगली नाही. सत्ता गमावल्याने दूर गेलेले कार्यकर्ते आणि बड्या नेत्यांमधील वितुष्ट यामुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेस गलितगात्र झाली आहे. याशिवाय सामान्य माणूसही पक्षापासून दूर गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्य माणसाचा आवाज होण्याचे, आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्याचे काम काँग्रेसला करावे लागेल. ही आव्हाने पाहता राहुल यांची वाट नक्कीच बिकट आहे.