सात लाख कोटींच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अल्प

भारतातील नवउद्यमींमध्ये चांगली बुद्धिमत्ता असून त्यांनी त्याचा वापर करून देशाला खेळणी निर्मितीचे जगातील मोठे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच खेळणी उत्पादनाच्या बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवण्यासाठी बैठक घेतली होती. सध्या चीन हा जगातील खेळणी उत्पादनात अग्रेसर देश आहे.

‘मन की बात’मध्ये ते म्हणाले की, जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा खूप कमी आहे. तो वाढवण्याची गरज आहे. नवउद्यमींनी एकत्र येऊन खेळणी तयार करावीत. स्थानिक खेळण्यांसाठी आग्रह धरण्याची हीच वेळ आहे. तरुण उद्योजकांनी मुलांसाठी भारतात संगणकाधारित खेळही तयार करावेत. ते खेळ भारतीय संकल्पनांवर आधारित असावेत.

स्थानिक खेळण्यांच्या निर्मितीसाठी आग्रही राहण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की,  भारतात अनेक नवीन संकल्पना आहेत, आपला इतिहास संपन्न आहे. देशाचा वारसा व परंपराही तितकीच संपन्न असताना आपण खेळणी व संगणकावरील खेळांच्या उद्योगात नवीन काही तरी नक्कीच करू  शकतो. भारतातील स्थानिक  खेळण्यांची परंपरा मोठी आहे. आपल्याकडे ही खेळणी तयार करणारे बुद्धिमान व तज्ञ कलाकार आहेत, आपल्या देशात काही भाग हे खेळण्यांसाठी प्रसिद्ध असून खेळणी उत्पादक संकुले म्हणून मान्यता पावले आहेत. खेळण्यांच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील उज्ज्वल भूतकाळ व सोनेरी भविष्य यांचा सेतू बांधू शकतो. त्यासाठी नवउद्यमींनी एकत्र येऊन कल्पक खेळण्यांचे उत्पादन करावे.

सप्टेंबर हा पोषण महिना

सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून पाळला जाणार असून विशेष करून खेडय़ात पोषण ही सामूहिक चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा  पंतप्रधान मोदी यांनी  व्यक्त केली. भारतीय कृषी निधीची स्थापना करण्यात येत असून यापुढे प्रत्येक जिल्ह्य़ातील पिकांची व त्यातील पोषण मूल्यांची माहिती संकलित केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘देशी प्रजातींचे श्वान पाळा

मोदी यांनी सांगितले की, अनेक लोक श्वान पाळतात, पण त्यांनी त्यांच्या घरात यापुढे देशी प्रजातीचे  श्वान पाळावे. सुरक्षा दलातही देशी  श्वान काम करीत आहेत. दहशतवादी कारवायांच्या तपासातही त्यांचा मोठा वाटा आहे.

कर्नाटकात पाच वर्षांत खेळणी उत्पादन संकुल

बेंगळुरु : कर्नाटकातील कोप्पल येथे येत्या पाच वर्षांत खेळणी उत्पादन संकुल उभारण्यात येणार असून तेथे पाच हजार कोटी  रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. त्यातून चाळीस हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिली.

जेईई-नीट परीक्षांवर चर्चा करा-राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी खेळणी उद्योगाचा उल्लेख केला पण, त्यांना जेईई- नीटच्या विद्यार्थ्यांच्या समस्येची दखल घ्यावी असे वाटले नाही, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. मोदी यांच्या भाषणानंतर, ‘मनातील नव्हे, विद्यार्थ्यांची गोष्ट’ असे हॅशटॅग करत, (विद्यार्थ्यांना) परीक्षेवर चर्चा हवी होती, तुम्ही तर खेळण्यांवर चर्चा केली, अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली.

जेईईची परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी  घेतली जाणार असून त्याविरोधात बिगरभाजप राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली आहे. त्या आधी झालेल्या बठकीत सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सप्टेंबरमध्ये या परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला होता. मात्र, विद्यार्थ्यांनीच परीक्षा घेण्याची आग्रही मागणी केल्याचा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी केला. या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसने मोहीमही सुरू केली आहे.