भारतीय वंशाच्या चार प्रमुख अमेरिकन उद्योजकांचा चेंबर ऑफ कॉमर्सकडून उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. अमेरिकी असलेल्या तीन उद्योजकांचाही गौरव यावेळी करण्यात आला. भारत व अमेरिका यांच्यात व्यापाराच्या माध्यमातून मैत्रीचे पूल या उद्योजकांनी उभे केले आहेत असे सांगण्यात आले. येथील एका कार्यक्रमात इंडो अमेरिकन चेंबर कॉमर्स या ग्रेटर ह्य़ूस्टनच्या संस्थेने उद्योजकांचा सत्कार केला. वर्षांतील तरूण यशस्वी उद्योजक म्हणून मलिशा पटेल (वय ३६) यांचा सत्कार करण्यात आला त्या मेमोरेल हेरमान हॉस्पिटल या सुगरलँड येथील संस्थेच्या मुख्य कार्यसंचालन अधिकारी आहेत. महिला उद्योजक पुरस्कार रेवती पुराणिक यांना देण्यात आला. त्या तेल व वायू क्षेत्रातील उपकरणे तयार करणाऱ्या ऑइलफील्ड मशीन कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी आहेत. लिंडॉलबसेल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश पटेल यांना वर्षांतील प्रमुख उद्योजक पुरस्कार देण्यात आला तर शिपकॉम वायरलेस कंपनीचे अबेझार एस तय्यबजी यांचाही गौरव करण्यात आला. जीवनगौरव पुरस्कार शेलचे माजी अध्यक्ष मार्विन ओडम, ह्यूस्टन मायनॉरिटी सप्लायर डेव्हलपमेंटचे माजी अध्यक्ष रिचर्ड हुबनेर, अँडर्सन कॅन्सर सेंटरचे माजी अध्यक्ष डॉ. जॉन मेंडलन यांना देण्यात आला. त्यांनी भारत व अमेरिका यांच्यात व्यापार मैत्री वाढवल्याचे सांगण्यात आले. बिल्डींग ब्रिजेस कार्यक्रमास ७०० पाहुणे उपस्थित होते त्यात महावाणिज्यदूत डॉ. अनुपम रे, ह्य़ूस्टन विद्यापीठाच्या कुलुगरू रेणू खटोर यांचा समावेश होता. काँग्रेस सदस्या शीला जॅकसन ली, अल ग्रीन, पीट ओल्सन, हॅरिस परगण्याचे न्यायाधीश एड एमेट्स ह्यूस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर, जॅक ख्रिसती, ख्रिस ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते. ह्यूस्टनमधील किमान ७०० कंपन्या भारतात उद्योग व्यापार करीत आहेत.