व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. पदावर असताना चंदा कोचर यांनी बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन केले असे चौकशी अहवालात म्हटले आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.

आयसीआयसीआय ही देशातील तिसरी मोठी बँक आहे. यापुढे चंदा कोचर यांना बोनससह अन्य भत्ते देण्यात येणार नाहीत असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेने वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटींचे कर्ज दिले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता.

बँकेने व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिले त्याचवेळी धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. चंदा कोचर या वर्तनासंबंधी आयसीआयसीआय बँकेने अंतर्गत चौकशी सुरु केल्यानंतर सुरुवातीला त्या दीर्घ रजेवर गेल्या. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात चंदा कोचर यांनी बँकेतील आपल्या पदांचा राजीनामा दिला.