हरयाणामधील सोहना येथे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. दिल्लीजवळच्या गुरुग्रामला लागून असलेल्या या भागामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची टीका अनेकदा येथील स्थानिकांकडून केली जाते. असाच एक प्रकार फव्वारा चौक येथे पुन्हा घडला असून यावेळी थेट पोलिसांना मारहाण करण्यात आलीय. ड्युटीवर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दोन तरुणांनी बेदम मारहाण केलीय. या पोलीस कर्मचाऱ्याने तरुणांकडे गाडीची कागदपत्र दाखवण्याची मागणी केली होती. मात्र या पोलीस कर्मचाऱ्याला कागदपत्र दाखवण्याऐवजी आरोपींनी या पोलिसाला मारहाण केली. इतक्यावरच न थांबता या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्याला तुझ्या पोरांना घरातून उचलून घेऊन जाऊ अशी धमकीही दिली. यावेळी पोलीस चौकीमधील एक कर्मचाऱ्यांनी या तरुणांच्या तावडीतून मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली.

सोहना पोलिसांनी नंतर दोन्ही तरुणांनाविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतलं. या तरुणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आळं. दोन्ही आरोपी हे भिरावठी आणि कायीयाका गावाचे रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याचे नाव नरेश कुमार असून तो सोहना पोलीस चौकीजवळ असणाऱ्या नाक्यावर तैनात असतानाच हा हल्ला झाला. नरेश या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकी गाड्यांना थांबवून त्यांच्याकडील कागदपत्र तपासत होता. त्याचवेळी हल्ला करणारे हे दोन तरुण तोंडाला कापड बांधून तिथून जात होते. या तरुणांच्या बाईकवर नंबर प्लेटही नव्हती.

नरेशने या दोघांनाही हटकलं असता त्यांनी खाली उतरुन नरेशला मारहाण करण्या सुरुवात केली. दोघांनी या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दीही फाडली. झालेला गोंधळ पाहून जवळच्या पोलीस चौकीमधून काही पोलीस कर्मचारी धावतच घटनास्थली दाखल झाले. त्यांनी नरेशला तरुणांच्या तावडीतून सोडवलं. मात्र मारहाण थांबल्यानंतरही या दोघांनी नरेशला तुझ्या मुलांना घरातून उचलून घेऊन जाऊ अशी धमकी दिली.

अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीव असलेला तरुण आहे. ठेक्यावर चोरीची दारु विकल्याप्रकरणी यापूर्वी या तरुणावर कारवाई झाली होती. या दोघांविरोधात सहा वेगवेगळ्या कलामांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.