चंदीगडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलानं तरुणीचा पाठलाग आणि छेड काढल्याचं प्रकरण ताजं असताना गुरुग्राममध्येही एका तरुणीचा दोन तरुणांनी पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणारी तरुणी सोमवारी रात्री उशिरा स्कूटरवरून घरी परतत होती. त्याचवेळी कारमधील दोन तरुणांनी तिचा पाठलाग केला. तसंच तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित तरुणीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २२ वर्षांची पीडित तरुणी राजीव नगरमध्ये राहते. ती सेक्टर १८ मधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करते. सोमवारी रात्री उशिरा ती ऑफिसमधून स्कूटरवरून घरी जात होती. सरहौल वळणावर आली असता कारमधून आलेल्या तरुणांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. भेदरलेली तरुणी थांबली नाही. त्यानंतर तरुणांनी तिचा पाठलाग केला. जवळपास तीन किलोमीटरपर्यंत त्यांनी तिचा पाठलाग केला. येथील अतुल कटारिया चौकातही तिला थांबवण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला. तरुणी प्रचंड घाबरलेली होती. ती थांबली नाही. अखेर ते तरुण तेथून पसार झाले. घरी पोहोचल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना तिनं घडलेला प्रकार सांगितला. मंगळवारी दुपारी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सेक्टर १४ मधील पोलिसांनी हे प्रकरण सेक्टर १८मधील असल्याचं सांगितलं. अखेर या तरुणीनं पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यांनी दखल घेऊन हे प्रकरण सेक्टर १४ मधील पोलिसांकडे सोपवलं. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.