चंदीगडमधील आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका कुंडू हिचा पाठलाग केल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे हरयाणा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यानं दिली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं आपला गुन्हा मान्य केल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं ‘एएनआय’नं दिलं आहे. चंदीगड पोलिसांनीच काल विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार याला अटक केली होती. आज दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार हे दोघेही बुधवारी चंदीगडमधील सेक्टर २६ मधील पोलीस ठाण्यात हजर झाले होते. विकासविरोधात पाठलाग करणे आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही पोलिसांनी दाखल केला आहे. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांनी या घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत. त्यात विकास वर्णिकाच्या कारचा पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत आहे. विकास आणि त्याच्या मित्रावर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरोधात कलम १६० नुसार गुन्हा नोंदवला आहे. तर विकासविरोधात कलम ३५४ डी, ३४१, ३४ आणि १८५ एमव्ही अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती चंदीगडचे पोलीस अधिकारी तेजिंदरसिंह लुथरा यांनी दिली. ४ ऑगस्टच्या रात्री विकास आणि त्याच्या मित्रानं वर्णिकाच्या कारचा पाठलाग केला होता. तसंच तिची छेड काढली होती. या प्रकरणी वर्णिकानं तक्रार दिल्यानंतर या दोघांना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. त्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेच्या निषेधार्थ अनेकांनी आवाज उठवला होता. त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी बुधवारी विकास बराला याला समन्स बजावले होते. त्यानंतर संध्याकाळी विकास बराला पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांची तब्बल तीन तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती.