तरुणीचा पाठलाग केल्याने गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेत्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून सेक्टर २६ मधील पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून पोलिसांनी फुटेज गोळा केले आहेत. आरोपी विकास बरालाविरोधात भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला असून यामुळे विकासच्या अडचणी वाढल्या आहेत.

हरयाणातील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या कारचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास (वय २३) आणि त्याचा मित्र आशीष कुमार (वय २७) या दोघांना अटक झाली होती. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. मात्र सत्ताधारी भाजप नेत्याचा मुलगा असल्याने विलास आणि त्याच्या मित्राच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत होता. यात भर म्हणजे पोलिसांनी सोमवारी पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला होता.

मंगळवारी चंदिगढ पोलिसांना अखेर सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पोलिसांना सेक्टर २६ मधील पाच कॅमेऱ्यांमधून सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यात आरोपी विकासची कार पीडित तरुणीच्या कारचा पाठलाग करताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आरोपी पीडित तरुणीच्या कारचा पाठलाग करताना व्हिडिओत दिसते. काही वृत्तवाहिन्यांनीदेखील हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केले आहे. पोलिसांनी या फुटेजविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. आणखी सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. मार्घावरील २३ कॅमेरे बंद होते. त्यामुळे दुकानदार आणि इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर गरज भासल्यास आरोपपत्रात आणखी कलमे अंतर्भूत केले जातील असे पोलिसांनी सांगितले.

सौ. एनडीटीव्ही