आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी रात्री उशीरा जेडीएस अध्यक्ष एचडी देवगौडा व कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेतली. दिल्लीत ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीनंतर रात्री उशीरा नायडू यांनी बंगळुरू गाठत देवेगौडा यांच्याबरोबर जवळपास तासभर चर्चा केली. ईव्हीएम छेडछाडीच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी नायडूंची मागिल काही दिवसांपासून धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे.

नायडूं म्हणाले की, आधी भाजपाने देखील ईव्हीएमचा विरोध केला होता. उत्तर प्रदेशात तर आम्ही घर व हॅाटेलमध्ये देखील ईव्हीएम पाहिले आहेत. स्ट्रॅाग रूम बदलल्या जात आहेत. विरोधकांनी उचलून धरलेल्या ईव्हीएमच्या मुद्यावरील पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत बोलताना नायडूंनी सांगितले की, पंतप्रधान का विरोध करत आहेत? ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आहेत. तुम्ही ९ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. तुम्ही पारदर्शक व उत्तरदाई का दिसत नाहीत ? याचा अर्थ तुम्ही खोडकरपणा करत आहात, तुम्ही ईव्हीएमशी छेडछाड करत आहात. तर देवेगौडा यांनी सांगितले की, त्यांनी देखील २००६ मध्ये ईव्हीएमवरून निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. ते म्हणाले की या अडचणींपासून वाचण्यासाठी मतपत्रिकांना परत आणले गेले पाहिजे.

विरोधी पक्षांनी कायमच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते मतपत्रिका व ईव्हीएम जोडणीची मागणी करत आहेत. यासंदर्भात त्यांनी नवी दिल्लीत आयोगाला निवेदन पत्रिका सादर केली आहे. काँग्रेस, द्रमुक, टीडीपी व बसपासह २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन सादर करत, मतमोजणी अगोदर कुठल्याही पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची सत्यता पडताळून पाहाण्याची मागणी केली आहे.