आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू इंडियन स्कूल ऑफ बिझनेस प्रमाणेच एक मोठं बी स्कूल अमरावतीत सुरू करण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशला या बी स्कूलचा अर्थात व्यापारी शिक्षण संस्थेचा सर्वाधिक फायदा होणार आहे. हैदराबादला आयटी हब ही ओळख मिळाली ती चंद्राबाबू नायडू यांच्यामुळेच. मात्र विभाजनानंतर हैदराबाद तेलंगणामध्ये गेलं त्यामुळे आता अमरावतीमध्ये सर्वात मोठं बी स्कूल उभारण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे.

१०० एकर जागेत ५०० कोटी रूपये गुंतवून हे बी स्कूल उभारलं जाणार आहे. याची ब्लू प्रिंटही तयार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, हार्वर्ड स्कूल, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि ग्लोबल कॉर्पोरेट वर्ल्डकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. तसंच वर्ल्ड बँक, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांनाही ग्लोबल पार्टनर करण्याची तयारी चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केली आहे.

या प्रकल्पाची जबाबदारी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक आणि अधिष्ठाता प्रथमराज सिन्हा यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. १० पेक्षा जास्त भागीदारांसोबत हातमिळवणी करून हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे असं आंध्र प्रदेशचे माजी चीफ सेक्रेटरी एस. पी टकर यांनी म्हटलं आहे. तसंच सिन्हा यांच्यासोबत आमची चर्चा झाली आहे ते नव्या बी स्कूलची जबाबदारी घ्यायला तयार आहेत असंही टकर यांनी म्हटलं आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी ‘आयएसबी’ चा यशस्वी प्रयोग हैदराबादमध्ये करून दाखवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आंध्र प्रदेशातल्या अमरावतीत देशातलं सर्वात मोठं बी स्कूल उभं राहणार आहे. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे यात शंकाच नाही.