टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झालेले एन. चंद्रशेखरन यांचे रतन टाटा यांनी कौतुक केले आहे. चंद्रशेखरन यांनी त्यांचे नेतृत्वगूण सिद्ध केले असून आता ते टाटा समुहाला नव्या उंचीवर नेतील अशा शब्दात रतन टाटा यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत केले आहे.

टाटा समुहातून सायरस मिस्त्री यांची गच्छंती झाल्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून अध्यक्षांचा शोध सुरु होता. अखेर टीसीएसचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एन. चंद्रशेखर यांच्या निवडीवर रतन टाटा यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली आहे. रतन टाटा यांनी एन चंद्रशेखरन यांचे कौतुक केले. टाटा म्हणाले, टाटा समुहाच्या अध्यक्षपदाचे काम आव्हानात्मक आहे. पण नितीमत्ता आणि मूल्यांचे पालन करत ते टाटा समुहाला नवी उंची मिळवून देतील असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला.

सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी गुरूवारी एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातील टीसीएस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात मास्टर्सची पदवी घेतलेल्या चंद्रशेखरन १९८७ साली टाटा समूहात नोकरीला लागले. त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत २००९ मध्ये ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते. चंद्रशेखरन हे काही काळासाठी सेंट्रल बँकेच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. उद्योगविश्वात ते चंद्रा या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा समूहातील वरिष्ठांनी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

टाटा उद्योग समुहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबरला तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. अवघ्या ४२ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.