समस्त भारतीयांचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-२ मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील तळावरुन चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके३-एम१ प्रक्षेपकाने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे अशा शब्दात इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी या मोहिमेचे वर्णन केले.

ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे. अज्ञात असलेल्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. आपले कार्य संपलेले नाही. आता आपण पुढच्या मोहिमेवर काम सुरु करणार आहोत. यावर्षी अनेक मोहिमा आहेत. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या सर्वांना माझा सलाम असे सिवन म्हणाले.

चांद्रयान-२ १५ जुलैला अवकाशात झेपावणार होते. पण तांत्रिक अडचणीमुळे हे उड्डाण लांबले होते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मागचा आठवडाभर अविश्रांत मेहनत करणाऱ्या शास्त्रज्ञांना के. सिवन यांनी सलाम केला आहे. उड्डाणानंतर ४८ दिवसांनी चांद्रयान-२ मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.