भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. महत्वाकांक्षी मोहिमेत संभाव्य यश न मिळाल्यामुळे वैज्ञानिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यावेळी इस्रोमध्ये उपस्थित असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देत त्यांनी केलेल्या कामाचा गौरव केला होता. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ‘चांद्रयान-2’ यशस्वी न होण्यामागे मोदींचा पायगुण असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो कार्यालयात हजर होते. हा मोठा अपशकून होता असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

सात सप्टेंबर रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार होते. विक्रम लँडर अवघ्या २.१ कि.मी अंतरावर असताना संपर्क तुटला. संपर्क सुरू होता तोपर्यंत लँडरमधील सर्व सिस्टम, सेन्सर्स अत्यंत अचूकतेने काम करत होते. असे उल्लेख करत कुमारस्वामी म्हणाले की, जसे काय मोदी चंद्रयान -२ चंद्रावर लँड करणार आहेत, असा संदेश देण्यासाठी इस्रोच्या कार्यालयात आले होते. या मोहिमेसाठी वैज्ञानिकांनी दहा ते १२ वर्ष मेहनत घेतली. पण मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने इस्रोमध्ये आले होते. त्यांनी इस्रोच्या कार्यालयात पाय ठेवला आणि तो क्षण शास्त्रज्ञांसाठी दुर्भाग्याचा ठरला.

विक्रमच्या मदतीला नासाचा –
इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित झाल्यास लँडर आणि रोवरचं काम सुरू होईल आणि या मोहिमेला १०० टक्के यश मिळेल. आता भारताच्या या चांद्रायन मोहिमेत इस्रोला नासाचीही साथ मिळाली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने ‘हॅलो’ असा संदेश पाठवला आहे.आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे (डीएसएन) नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली असल्याची माहिती नासाच्या सूत्रांकडून देण्यात आली. नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.