‘इस्रो’ची घोषणा : गगनयान मोहिमेसाठी हवाई दलाच्या चार जणांची निवड

बंगळूरु : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ योजनेची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी केली. गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून, त्यांना लवकरच रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तिसऱ्या चांद्रयान मोहिमेचे काम प्रगतिपथावर आहे. या मोहिमेत लँडर, रोव्हर, इंधन यंत्रणा अशा तीन घटकांचा समावेश असणार आहे. चांद्रयान ३ मोहीम पुढील वर्षी होईल. चांद्रयान ३ आणि गगनयान या दोन्ही मोहिमांचे काम सुरू आहे, असे शिवन यांनी सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेत यानाचा वेग कमी करताना आवश्यक समतोल साधला न गेल्याने यान चांद्रभूमीवर आदळले, असे शिवन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

गगनयान या भारताच्या समानव मोहिमेबाबत त्यांनी सांगितले की, चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण रशियात या महिन्यात तिसऱ्या आठवडय़ात सुरू होत आहे. हे चारही जण भारतीय हवाई दलातील आहेत. भारत आणि रशिया तसेच भारत व फ्रान्स यांच्यात गगनयान मोहिमेविषयी करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. त्यासाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

* चालू वर्षांत एकूण २५ अवकाश मोहिमांचे नियोजन

* गेल्या वर्षी नियोजन करूनही पूर्ण न झालेल्या मोहिमा मार्चपर्यंत पूर्णत्वास

* तामिळनाडूत तुतीकोरीन येथे नवे प्रक्षेपण केंद्र

* एसएसएलव्ही म्हणजे लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी या प्रक्षेपण केंद्राचा वापर