मनोहर पर्रिकर यांना आजाराने ग्रासले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही ते काम करत आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या गोव्यात नेतृत्वबदल करावाच लागेल. ही काळाची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्र्यानेच गोव्यात नेतृत्वबदलाची भूमिका मांडल्याने भाजपाची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जून महिन्यापासून पर्रिकर हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकले नाहीत. यावरुन काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे हयात असल्याचे दाखवा, अन्यथा त्यांचं श्राध्द घाला असं आव्हानच काँग्रेसने दिले होते. काँग्रेसच्या आव्हानानंतर भाजपाने मनोहर पर्रिकर यांचे निवासस्थानी बैठक घेतानाचे फोटो प्रकाशित केले होते. या छायाचित्रांमध्ये मनोहर पर्रिकर मंत्र्यांसोबत चर्चा करताना दिसत होते.

गोव्यात या घडामोडी घडत असतानाच आता आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नेतृत्वबदलाबाबत भाष्य करुन भाजपाची कोंडीच केली आहे. शुक्रवारी
एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी नेतृत्वबदलाबाबत भूमिका मांडली. ‘मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत सर्वांनाच माहित आहे. त्यांची प्रकृती पाहता गोव्यात आज किंवा उद्या नेतृत्व बदल करावाचं लागेल, ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोव्यात नेतृत्व बदल करणार नाही, असे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केल्यानंतरही श्रीपाद नाईक यांनी ही भूमिका मांडली आहे.

मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंतच भाजपाला पाठिंबा देऊ अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या पक्षांनी घेतली आहे. सध्या गोव्यात या दोन पक्षांच्या पाठिंब्यावरच भाजपाची सत्ता आहे. तर दुसरीकडे भाजपामधील अंतर्गत संघर्षही चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात घेतल्याने एक गट नाराज आहे. गोव्यातील भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयावर या गटाने नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे गोव्यात आता भाजपा काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.