नामांतरानंतर देशातील शहरे जर प्रगती करणार असतील तर देशातील १२५ कोटी भारतीयांचे नामकरण ‘राम’ असे करावे, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला आहे. या देशात बेरोजगारी, शेतकरी आदी समस्या असतानाच ही लोक नामकरण आणि मूर्ती- स्मारकांमध्ये अडकली आहेत, असे सांगत त्यांनी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे बुधवारी उत्तर प्रदेशमधील संभल येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर टीका केली. हार्दिक पटेल म्हणाले, शत्रूंशी लढण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर त्यांची बाजू आणखी भक्कम होईल. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असे सांगितले जाते. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारीची समस्या आहे. रोजगाराअभावी तरुणांना दुसरीकडे फिरावं लागतंय. आम्ही यावर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा राम मंदिराचा मुद्दा आहे. या आधारे हिंदू मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सीबीआय, राफेल, आरबीआय या मुद्द्यांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला जातो. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील वातावरण खराब करत आहे. नामकरणामुळे देशातील शहरे ‘सोने की चिड़िया’ होणार असतील तर १२५ कोटी भारतीयांचे नाव राम ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला.