पीक चांगले यावे, यासाठी गोवा सरकारने आता वेद मंत्रांचा आधार घेण्याची तयारी सुरु केली आहे. पीक चांगले यावे, यासाठी शेतकऱ्यांनी दररोज २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे सरकारने म्हटले आहे. गोवा येथील कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.

डॉ. अवधूत शिवानंद यांनी शिवयोग कृषी सेवा हा उपक्रम सुरु असून यात शेतीसाठी मंत्रोच्चाराचा वापर केला जातो. विजय सरदेसाई यांची पत्नी उषा या शिवानंद स्वामी यांच्या भक्त आहेत. ‘या उपक्रमासाठी पैशांची गरज नाही. शेतीकडे लोकांनी आकर्षित व्हावे, यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून यासाठी मी सौंदर्यस्पर्धा किंवा रॉक शोचे आयोजन करण्यासही तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.

जानेवारी महिन्यात विजय सरदेसाई यांची पत्नी उषा यांनी कृषी विभागाचे संसालक नेल्सन फिगेरिएडा यांच्यासह डॉ. शिवानंद यांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. यात त्यांनी शेत जमिनीचे महत्त्व सांगितले होते.

गेल्या आठवड्यात गोव्यातील शेतकऱ्यांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात डॉ़. शिवानंद बाबा हे शेतात बसून ध्यान करताना दिसतात. २० मिनिटे वेद मंत्राचे पठण केल्यास पीक चांगले येते, असे डॉ. शिवानंद बाबांचे म्हणणे आहे. गोव्यातील शेतकऱ्यांनीही या पद्धतीचा वापर करावा, असे कृषिमंत्र्यांने सांगितले. सुरुवातीला मला देखील हे खरे वाटले नव्हते. पण याबाबत बाबांनी केलेले संशोधन वाचल्यानंतर माझ्या शंका दूर झाल्या, असे त्यांनी सांगितले.