‘प्रदेश में रहना है तो योगी-योगी कहना है’ असे पोस्टर मेरठमध्ये लागल्याने शहरात खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने हे पोस्टर्स काढून टाकले आहेत. या पोस्टर्सचा आणि आमचा काही संबंध नसल्याचे हिंदू युवा वाहिनीने स्पष्ट केले आहे. आमचे नाव खराब करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचे युवा वाहिनीने स्पष्ट केले आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथांचे छायाचित्र आहे. मेरठचे जिल्हाध्यक्ष नीरज शर्मा पांचली यांचा देखील या पोस्टरवर फोटो आहे.

नीरज शर्मा यांना आधीच हिंदू वाहिनीने काढून टाकले आहे असे हिंदू युवा वाहिनीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र तोमर यांनी म्हटले. नीरज शर्मा यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना मागच्या महिन्यात काढून टाकण्यात आल्याचे म्हणत तोमर यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे हिंदुस्तान टाइम्सने म्हटले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष करुनेश नंदन गर्ग यांनी भाजपचा आणि या पोस्टरचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदू युवा वाहिनी ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि त्यांचा भाजपशी काही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायद्याचे पालन करावे आणि जबाबदारीने वागावे अशी सूचना आदित्यनाथांनी आम्हाला दिली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याकडून अशी चूक होणार नाही असे गर्ग यांनी म्हटले.  याआधी, अयोध्येमध्ये राममंदिर बनावे ही मुस्लिमांचीही इच्छा आहे असे पोस्टर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे लावण्यात आले होते. पूर्ण शहरात राम मंदिर निर्माणाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. मुस्लिमों का यही अरमान, श्रीराम मंदिर का हो वहीं निर्माण असे मुस्लिमांनी आपल्या पोस्टरवर लिहिले आहे. मुस्लिम कार सेवक मंचाचे अध्यक्ष आजम खान यांनी पूर्ण शहरात असे दहा पोस्टर्स लावले होते. या पोस्टरमुळे देखील शहरात खळबळ उडाली होती.

हिंदू आणि मुस्लिमांनी समजूतदारपणे या विषयावर चर्चा करावी असे न्यायालयाने म्हटले होते. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सत्तेमध्ये आल्यावर राम मंदिर बांधले जाईल असे त्यांनी म्हटले होते. आपण गेल्या दहा वर्षांपासून हिंदू मुस्लिमांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करत आहोत असे आजम खान यांनी म्हटले होते.