भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी बिहारमधील गया येथील सभेसाठी दाखल होत असताना सभेला उपस्थित जनसमुदायामध्ये गोंधळ उडाला.
मोदींचे भाषण ऐकण्यासाठी हजर असलेल्या गर्दीमध्ये अचानक धुमाकूळ माजला, उपस्थित गर्दी सैरावैरा पळू लागली. पोलिसांनी गर्दीला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांवरही चप्पल फेकीचा प्रकार झाल्याने पोलिसांना गर्दीला सावरण्यासाठी सौम्यप्रमाणत लाठीमार करावा लागला.
गोंधळाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
याआधी नरेंद्र मोदींच्या २७ ऑक्टोबर २०१३ रोजी बिहारमधील गांधीमैदानात झालेल्या सभेत साखळी बॉम्बस्फोटाचा प्रकार घडला होता. त्यामुळे यावेळी बिहार पोलिसांकडूक कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, तरीही मोदींच्या यावेळीच्या सभेसाठी उपस्थित गर्दीत गोंधळ उडाला. लाखोंच्या संख्येची गर्दी असल्यामुळे गोंधळाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच झालेल्या गोंधळामुळे सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाल्याचे वृत्त नाही.