दिल्लीवरुन पुण्यासाठी उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानातील प्रवाशांमध्ये गुरूवारी(दि. ४) संध्याकाळी एकच गोंधळ उडाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरुन पुण्यासाठी विमान टेक-ऑफ घेणार इतक्यात एका प्रवाशाने त्याला करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं आणि प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर्समध्येही गोंधळ उडाला. शुक्रवारी इंडिगोकडून याबाबत माहिती देण्यात आली.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चार मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्याला जाणारं इंडिगो विमान(6E286) टेक-ऑफ करणार इतक्यात एका प्रवाशाने स्वतःला करोनाची लागण झाली आहे असं क्रू मेंबरला सांगितलं. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती विमानाच्या पायलटला देण्यात आली , त्यानेही तात्काळ पावलं उचलत विमान टॅक्सी पार्किंग बेच्या दिशेने वळवलं. तिथे विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं, करोनाची लागण झाल्याचं सांगणाऱ्या प्रवाशालाही तिथे उतरवण्यात आलं.

नंतर करोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला विमानतळ वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले, तिथे त्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला, असे इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दरम्यान विमानात सॅनिटायझरने स्वच्छता करण्यात आली, शिवाय सीटचे कव्हर्सही बदलण्यात आले. त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास दोन तास उशीर झाला, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. विमान कंपनीने केंद्र सरकार आणि विमान प्राधिकरणाने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये मात्र एकच गोंधळ उडाला होता. धावपट्टीवरुन विमान पुण्यासाठी उड्डाण घेणार त्याचवेळी हा प्रकार घडला.