करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पुर्ण झालं. मात्र आजही जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. एकीकडे जग करोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे मानवाकडून मानवाला संसर्ग होणारा आणखीन एक विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला आहे. अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्था असणाऱ्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही (सीडीसी) हा विषाणू सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे पुरावे आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग ताप येतो आणि हा ताप थेट मेंदूवर परिणाम करतो. या विषाणूमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असतो. हा विषाणू इबोलासारखाच आहे. इबोला हा विषाणूही संसर्ग होण्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यशही आलं होतं.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बोलिव्हियामध्ये सापडलेल्या या विषाणूचे नाव चापरे विषाणू (व्हायरस) असं आहे. सर्वात आधी हा विषाणू २००४ साली बोलिव्हियामध्ये चापरे भागात आढळून आला होता. लाइव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार सीडीसीने २०१९ साली या विषाणूचा संसर्ग तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना झाल्याचे स्पष्ट केलं आहे. या तिघांपैकी दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचेही सीडीसीेने सांगितलं आहे.

जॉर्जटाउन विद्यापिठातील संशोधक असणाऱ्या कॉलिन कार्लसन यांनी इबोलासारखे थेट मेंदूवर परिणाम करणाऱ्या विषाणूचा संसर्ग करोना किंवा अन्य फ्लूच्या विषाणूंपेक्षा लवकर दिसून येतो. हॅमरेज होणाऱ्या तापाची लक्षणं लगेच दिसून येतात. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येणाऱ्यांना याची लागण होण्याची शक्यात अधिक असते. मात्र अशाप्रकारे चापरेचा संसर्ग वाढत जाऊन त्याने साथीचे रुप धारण केल्यास आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतील अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. अशा रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अनेकदा याची लागण होते.

उपचार काय?

२०१९ मध्ये चापरे विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होत असल्याचे पहिल्यांदा दिसून आलं. चापरेच्या रुग्णांना डेंग्यूचा संसर्ग झाल्याचे समजून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सीडीसीच्या संशोधक असणाऱ्या मारिया मोराल्स यांनी ‘दक्षिण अमेरिकेमध्ये डेंग्यू हा सामान्य आजार आहे. हॅमरेज फिव्हरला कारणीभूत ठरणाऱ्या डेंग्यू शिवाय इतर गोष्टींचा इथे आधी विचार केला जात नाही. विशेष म्हणजे डेंग्यू आणि चापरे बऱ्याच प्रमाणात साधर्म्य असणारे आहेत,’ असं सांगितलं.

लक्षण कोणती?

सीडीसीमधील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ असणाऱ्या कॅटलिन कोसाबूम यांनी दिलेल्या माहितीनुसार चापरेचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ताप येणं, पोटात दुखणं, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणं, त्वचेवर व्रण उठणं, डोळे चुरचुरणं अशी लक्षणं दिसून येतात. या विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणतेही ठोस उपचार सापडलेले नसून करोनाप्रमाणेच जमेल त्या पद्धतीने रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करणे हाच सध्या एकमेव मार्ग उपलब्ध आहेत.