बॅटरी लो आहे ? चार्जरही सोबत नाहीये ? मग मोबाईलला थोडे पाणी पाजा! हो, आता पाणी वापरुन मोबाईल चार्ज करता येणार आहे. काही स्विडिश संशोधकांनी जगातील पहिला पाण्याचा वापर करुन मोबाईल चार्ज करता येणारा चार्जर बनवलाय. केटीएच रॉयल इन्स्टिट्यूटने एक मायक्रो फ्यूएल सेल टेक्नोलॉजीच्या आधारे माय एफसी पॉवर ट्रेक हे उपकरण तयार केले आहे. ज्यात चार्जिंग उतरलेल्या बॅटरीला पाण्याचा वापर करुन चार्ज करता येऊ शकते. यामध्ये बॅटरी 3 वॉट्सपर्यंत चार्ज करता येऊ शकते. 
एक यूएसबी कनेक्टर या पॉवर ट्रेक चार्जरला जोडण्यात आला आहे. जेव्हा या मेटॅलिक डिस्कवर पाणी टाकले जाते. तेव्हा त्यातून हायड्रोजन मुक्त होतो आणि ऑक्सिजनशी संयोग पावतो व यातून रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर होण्यास मदत होते.
“हे उपकरण साध्या किंवा समुद्रपाण्याने कार्यान्वित करता येऊ शकते. तसेच पाणी पूर्णपणे स्वच्छ असण्याचीही गरज नाही” असे केटीएचमधील या उपकरणाचे संशोधक अँडर्स लूंडब्लाड यांनी सांगितले. “आजही अनेक ठिकाणी विजेचा तुटवडा आहे. अशा भागांसाठी या उपकरणाचा फायदा होईल, ज्यात मोबाईलद्वारे हवामानाचा अंदाज आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट ही सुविधा वापरता येईल” असेही ते म्हणाले.