इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर लाच घेतल्याचे तीन आरोप करण्यात आले असून त्याबाबत त्यांना असलेले संसदीय संरक्षण काढून घेण्याची घोषणा त्यांनी केल्याने या आरोपांबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर इस्रायलच्या अ‍ॅटर्नी जनरलनी नेतन्याहू यांच्याविरुद्ध औपचारिक दोषारोप दाखल केले.

या प्रश्नावरून घाणेरडे राजकारण होऊ नये यासाठी संसदीय संरक्षण काढून घेण्याची विनंती आपण केल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी नेतन्याहू वॉशिंग्टन येथे आले असून त्यांनी तेथूनच आपल्या फेसबुक पोस्टमार्फत वरील निर्णय जाहीर केला आहे.

इस्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणाऱ्या नेतन्याहू यांच्यावर गेल्या नोव्हेंबर महिन्यात फसवणूक, विश्वासघात आणि लाचखोरीचे तीन आरोप करण्यात आले होते. मात्र नेतन्याहू यांनी आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे म्हटले आहे. नेतन्याहू यांना असलेल्या संसदीय संरक्षणाबाबत मंगळवारी इस्रायलच्या संसदेत चर्चा सुरू होणार होती. डोनाल्ड ट्रम्प मध्य-पूर्वेबाबतची, बहुप्रतीक्षित शांतता योजना जाहीर करणार असतानाच विरोधकांनी चर्चेची तयारी केल्याबद्दल नेतन्याहू यांनी विरोधकांवर टीका केली आहे.