ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलींमध्ये व्यापक कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बुधवारी १५ जणांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) इतर कलमांन्वये दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे १० हजार पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी ७४७ लोकांची नावे साक्षीदार म्हणून नमूद केली असून, त्यापैकी ५१ जणांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये त्यांचे बयाण नोंदवले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील हिंसक संघर्ष नियंत्रणाबाहेर गेल्याने ईशान्य दिल्लीत २४ फेब्रुवारीला जातीय दंगली उसळून किमान ५३ लोक ठार, तर २०० लोक जखमी झाले होते.