बलात्काराच्या आरोपांमुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वयंघोषित गुरू आसाराम यांच्या अडचणी आणखीनच वाढत आहेत. सुरतमधील एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर गुजरात पोलिसांनी गुरुवारी आसाराम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आसाराम यांच्याविरोधात याआधी जोधपूर, राजस्थान येथेही बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती जे बी पारिख यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आसाराम यांच्याशिवाय त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि आसाराम यांच्या चार महिला समर्थक ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बलात्कार, बेकायदेशीरपणे कैद करणे, गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. सुरत येथील रहिवासी असलेल्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सध्या आसाराम यांना जोधपूर येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.