लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील भाषणात काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी ‘गंदी नाली’ अशी टिप्पणी केली. त्यावर भाजपने आक्षेप घेतला असून अधिर रंजन यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रंजन यांनीही मोदींची निंदा करण्याचा आपला हेतू नव्हता, असे म्हणत माफी मागितली.

केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोदींची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. त्याचा संदर्भ घेत अधिर रंजन यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात, कहाँ माँ गंगा, कहाँ गंदी नाली, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याला सभागृहात संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला. अधिर रंजन यांनी अप्रत्यक्षपणे विवेकानंद यांना गंगा आणि मोदी यांची अवहेलना गंदी नाली अशी केली.

विवेकानंद आणि मोदींच्या नरेंद्र या नावात साम्य असल्याने ही तुलना केली गेली होती. त्यामुळे बंगालच्या स्वाभिमानाला धक्का लागतो. तुम्ही मला भडकवत असाल तर तुम्ही (सत्ताधारी) गंगेची तुलना नाल्याशी करत आहात असे मला म्हणावे लागेल, असे माझे म्हणणे होते, असे स्पष्टीकरण अधिर रंजन यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांकडे दिले. पंतप्रधान मोदी यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पंतप्रधान दुखावले गेले असतील तर मी माफी मागतो, असे अधिर रंजन म्हणाले. अधिर रंजन यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार करीट सोळंकी यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे पण, अजूनही त्यांच्या नेत्यांमधील उर्मटपणा गेलेला नाही. त्यांनी बदललेल्या राजकीय वातावरणाचा पुन्हा नीट विचार करायला हवा, असा सल्ला भाजपचे कार्याध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार जे. पी. नड्डा यांनी दिला.