News Flash

मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक, IAS ऐवजी आरोपीचा शिक्का

चेन्नई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने साफीरच्या पत्नीलाही अटक केली आहे.

साफीर करीम २०१५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. साफीर करीम असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला आयएएस व्हायचे होते. परीक्षेदरम्यान ब्लूटूथ हेडफोनचा वापर करुन करीम पेपर सोडवत होता.

तामिळनाडूतील तिरुनवेल्लीतील सहायक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेला साफीर करीम २०१५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. मात्र कमी गुणांमुळे त्याला आयएएसऐवजी आयपीएस व्हावे लागले. आयएएस व्हायची इच्छा असल्याने साफीरने यंदा पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र या वेळी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी साफीरने कॉपीचा मार्ग निवडला.
तामिळनाडू पोलिसांना यूपीएससीच्या परीक्षेत साफीर करीमने कॉपी केल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांचे एक पथक साफीरवर नजर ठेवून होते. सोमवारी चेन्नईजवळील परीक्षा केंद्रात साफीर मोबाईल, ब्लूटूथ हेडसेट आणि छुपा कॅमेरा घेऊन बसला होता. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना तपासणीदरम्यान साफीरने चलाखीने मोबाईल खोलीत नेला होता. प्रवेश करताना साफीरने त्याच्या खिशातील मोबाईल, पाकिट जमा केले. चुकून या वस्तू कारमध्ये ठेवायला विसरलो असे त्याने सांगितले. मात्र त्याने पायमोज्यांमध्ये आणखी एक मोबाईल, ब्लू टूथ हेडसेट आणि कॅमेरा लपवून ठेवला होता. साफीरने खोलीत प्रवेश केल्याच्या २० मिनिटांनी तामिळनाडू पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. त्यांनी साफीरची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला.

पोलीस चौकशीत साफीरने गुन्ह्याची कबुली दिली. करीम प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून त्याच्या पत्नीला पाठवायचा आणि त्याची पत्नी फोनवरुन उत्तर सांगायची. पोलिसांनी करीमला फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली अटक केली आहे. चेन्नई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने साफीरच्या पत्नीलाही अटक केली आहे.

साफीर हा मूळचा केरळमधील रहिवासी आहे. साफीर दाम्पत्य आणि त्यांच्या एका मित्राने इन्स्टिट्यूटही सुरु केले होता. स्पर्धा परीक्षा, यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे इन्स्टिट्यूट सुरु करण्यात आले होते. तिरुअनंतपूरम, कोच्ची, भोपाळ, हैदराबाद येथे कारिमच्या इन्स्टिट्यूटच्या शाखा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2017 12:52 pm

Web Title: cheating in upsc ips officer safeer karim his wife arrested tamil nadu police la excellence ias
टॅग : Cheating,Upsc
Next Stories
1 भजन-किर्तनाने ताणतणाव दूर होतो; ‘जेएनयू’चे संशोधन
2 रेल्वेच्या तिकिटांवर लवकरच तृतीयपंथीयांसाठी पर्याय
3 काही लोकांनी पटेलांचे योगदान विस्मृतीत जाण्यासाठी प्रयत्न केले; मोदींचा काँग्रेसवर निशाणा
Just Now!
X