पाठलाग करणाऱ्या तरुणाने तरुणीला घरात घुसून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना चेन्नईत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाशला अटक केली आहे. या घटनेत पीडित तरुणीचा मृत्यू झाला असून आरोपी आकाश हा बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चेन्नईतील सरस्वतीनगर येथे राहणाऱ्या इंदुजा या तरुणीचा आकाश (वय २३) हा गेल्या महिनाभरापासून पाठलाग करत होता. आकाशचे इंदुजावर एकतर्फी प्रेम होते. तर इंदुजाने आकाशला नकार दिला होता, असे इंदुजाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

सोमवारी रात्री आकाश इंदुजाच्या घरी गेला. घरात प्रवेश केल्यावर त्याने आत्महत्येची धमकी दिली. बाहेरच्या खोलीत काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी इंदुजा, तिची आई आणि बहीण या तिघी बाहेर पळत आल्या. यानंतर आकाशने बॉटलमधून आणलेले पेट्रोल त्यांच्यावर फेकले आणि लायटरने त्यांना पेटवले. घटनेतनंतर आकाश तिथून पळून गेला. शेजारच्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आणि तिघींना रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

घटनेत गंभीररित्या भाजलेल्या इंदुजाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. इंदुजाची आई रेणुका या घटनेत ४९ टक्के भाजली असून तिची बहीण निवेदा ही २३ टक्के भाजली आहे. दोघींची प्रकृती चिंताजनक असून धुरामुळे फुफ्फुसालाही इजा झाली आहे, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

इंदुजाचे वडील डी. शन्मुगम (वय ४८) हे कॅनडात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. या घटनेची माहिती मिळताच ते चेन्नईला परतले आहेत. इंदुजाचा १५ वर्षांचा लहान भाऊ हा घटना घडली त्यावेळी घरातच होता. मात्र, तो दुसऱ्या खोलीत झोपल्याने तो या घटनेतून बचावला आहे.