तुरुंग म्हटल्यावर अनेकांना भिती वाटते. सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या दृष्यांमुळे तुरुंगांबद्दल अनेक समज-गैरसमज जनसामान्यांमध्ये आहे. मात्र भारतासारख्या देशामध्ये लाखो कैदी तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत. कैद्यांमध्ये होणारे वाद आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भातील बातम्या अनेकदा पहायला मिळतात. अनेकदा कैदी तुरुंगात दिल्या जाणाऱ्या अन्नाबद्दल तक्रार करताना दिसतात. मात्र चेन्नईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. तुरुंगात मिळणारे चविष्ट जेवण आणि तेथील नवीन मित्रांचा सहवास मिळावा म्हणून एका कैद्याने सुटकेनंतर पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी गुन्हा केल्याचा प्रकार घडला आहे. सुटका झालेल्या या कैद्याला अटक करुन पोलिसांनी परत त्याच तुरुंगात डांबल्याने हा कैदी खूपच खूष आहे.

ज्ञानप्रकाशम असे या ५२ वर्षीय कैद्याचे नाव आहे. मार्च महिन्यामध्ये चोरीच्या आरोपाखाली ज्ञानप्रकाशमला अटक करुन पुझा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. २९ जून रोजी त्याला जामीन मंजूर झाल्याने तो तुरुंगातून बाहेर आला. मात्र तुरुंगामधील मित्र आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ट जेवणाची ज्ञानप्रकाशमला सतत आठवण यायची. त्यामुळेच पुन्हा तुरुंगात जाता यावे म्हणून ज्ञानप्रकाशम याने मुद्दाम एक दुचाकी आणि पार्क केलेल्या गाड्यांमधील पेट्रोल चोरले. इतकेच नाही चोरी कोणी केली याबद्दल पोलिसांचा गोंधळ होऊ नये आणि त्यांना आपली ओळख पटावी म्हणून ज्ञानप्रकाशमने मुद्दाम सीसीटीव्हीसमोर उभं राहून आपला चेहराही दाखवला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ज्ञानप्रकाशमला अटक करुन पुन्हा तुरुंगात टाकले आहे.

तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर ज्ञानप्रकाशम त्याच्या घरी गेला. मात्र घरचे लोक ज्ञानप्रकाशमकडे दूर्लक्ष करत होते. त्याला त्याची मुले आणि पत्नी शिवीगाळ करायचे. तसेच त्याची योग्य प्रकारे काळजीही घेतली जात नव्हती म्हणून तो दु:खी होता. घरी कोणीच त्याच्याशी बोलायचे नाही किंवा त्याची मस्करीही करायचे नाही. त्याला तुरुंगामधील मित्रांची आठवण येत होती असं त्याने अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आम्हाला सांगितल्याचं सहाय्यक आयुक्त पी अशोकन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

घरी मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे ज्ञानप्रकाशमने पुन्हा तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडल्यानंत ज्ञानप्रकाशमने पश्चिम तंबारममधील कैलासपूरम फर्स्ट स्ट्रीट येथून एक दुचाकी चोरली. त्यानंतर तो त्या दुचाकीवरुन याच परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर तो रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांमधील पेट्रोल चोरायचा. पोलिसांना आपली ओळख पटावी म्हणून तो चोरी करायला गेल्यावर सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दाखवायचा. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका दुचाकीमधील पेट्रोल चोरताना त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आल्यानंतर ज्ञानप्रकाशमने आपण केवळ पेट्रोल चोरले नसून दुचाकीही चोरीचीच असल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी ज्ञानप्रकाशम अटक करुन पुझा येथील तुरुंगात डांबले. त्यामुळे ज्ञानप्रकाशम पुन्हा आपल्या जुन्या मित्रांना भेटून खूपच खूष आहे.