देशात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांसाठी चेन्नई पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. चेन्नईतील पोलीस अधिकाऱ्यांनी एका कलाकाराच्या मदतीनं रस्त्यावरील लोकांना रोखण्यासाठी करोना हेल्मेट तयार केलं आहे.

“करोनाला लोकं गंभीरतेनं घेत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात लोकं आपल्या घराबाहेर पडत आहेत. पोलीस २४ तास लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. लोकं कोणत्याही कामासाठी आपल्या घराबाहेर पडू नये याची काळजी ते घेत आहोत. लोकांनी बाहेर पडणं टाळलं तर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल,” असं हेल्मेट तयार करणाऱ्या गौतम यांनी सांगितलं. “हे हेल्मेट तयार करण्यासाठी मी जुन्या तुटलेल्या हेल्मेटसह कागदाचा वापर केला. याव्यतिरिक्त काही घोषवाक्यही तयार केली आणि ती पोलिसांकडे सुपूर्द केली, “असंही त्यांनी नमूद केलं.

“हे हेल्मेट लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फार उपयोगी पडत आहे. याचा सकारात्मक प्रभावही पडला आहे. सर्व पोलीस मिळून काम करत आहेत, तरीही लोक रस्त्यांवर बाहेर पडत आहेत,” असं पोलीस निरिक्षक राजेश बाबू यांनी सांगितलं. “या हेल्मेटच्या माध्यमातून जनजागृती हे एक उचण्यात आलेलं उत्तम पाऊल आहेय. यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यास नक्कीच मदत मिळत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.