करोनाची साखळी तोडण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेने आता नव्या तंत्रांचा आणि पर्यायांचा विचार केला आहे. आता ते घरोघरी जाऊन स्क्रिनिंग कऱणं, फोनवरुन आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी नव्या डॉक्टरांची नेमणूक करणं, टेस्टिंग सेंटरमध्ये स्वॅब चाचणी करणाऱ्यांना औषधांच्या कीट्सचं मोफत वाटप करणं अशा योजना राबवणार आहे.

महापालिका आयुक्त गगनदीप सिंग बेदी यांनी सांगितलं की जे कोणी सरकारी टेस्टिंग सेंटर्स आणि खासगी दवाखान्यात करोना चाचणी करण्यासाठी येतील आणि त्यांना ताप, कफ, अंगदुखी, चव न लागणे , वास न येणे अशी लक्षणं असतील त्यांना संशयित म्हणून गणलं जाणार आहे. तसंच त्यांना काही प्राथमिक औषधं असलेलं कीट मोफत दिलं जाणार आहे. ते म्हणाले की, जे लोक आपल्या करोना अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत ते इतर लोकांच्या संपर्कात येऊन करोनाचा प्रसार करत आहेत.
त्याचबरोबर घरोघरी जाऊन ६० वर्षांखालील सर्वाचं स्क्रिनिंग कऱण्यात येणार असल्याची माहितीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यानंतर त्यांनी घरातच विलगीकऱणात राहावे की कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

आणखी वाचा- “…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

महापालिका प्रशासनाने १५ विभागांसाठी प्रत्येकी १ अश्या आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी त्या त्या भागातल्या करोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतील. करोनाच्या उपचारासाठी महानगरपालिका एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांनाही कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी सेवेत भरती करुन घेणार आहे. यापैकी काही विद्यार्थी गृहविलगीकरणातल्या रुग्णांना फोनवरुन मार्गदर्शन करतील. १५ विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांमधून हे डॉक्टर्स काम करतील.

महापालिका प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चाचणी करण्यासाठी आलेल्यांना मोफत औषधांचं कीट वाटप करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना १६००० कीट वाटण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. शहरातली सर्व कोविड केअर सेंटर्स लवकरच ऑक्सिजनयुक्त होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.