अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज (मंगळवारी) अटक करण्यात आली. रियाच्या अटकेच्या वृत्तानंतर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी ट्विट करत दिवाळी कधी आहे असा प्रश्न विचारला. ‘दिवाळी कधी आहे?…नोव्हेंबरमध्ये?.. नाही, तुम्हाला ती आज रात्री अनेक वृत्तवाहिन्यांवर साजरी होताना दिसणार आहे’, असं ट्विट चेतन भगत यांनी केलंय. याचसोबत त्यांनी आता इतर मुद्द्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे असा खोचक सल्लाही दिला.

‘भारतातील सर्वांत मोठी समस्या सोडवल्यानंतर आता नोकरी कशी मिळवायची, कॉलेजचं शिक्षण कसं पूर्ण करायचं किंवा करोनापासून मी कसा वाचू शकेन यांसारक्या छोट्या समस्यांकडे लक्ष द्यायला हरकत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. करोना, अर्थव्यवस्था आणि चीन या तीन समस्यांना एकाच झटक्यात नामोहरम केल्यासारखा जल्लोष साजरा होईल, असं म्हणत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला.

रिया चक्रवर्तीला अटक

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.