दिल्लीत १ नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयावर सुप्रिसद्ध लेखक चेतन भगत याने ट्विट करुन टीका केली. फटाक्यांशिवाय दिवाळीचा सण साजरा होऊच कसा शकतो? ‘देशातील लहान मुलांच्या हातून कोर्टाने फुलबाजीही हिसकावून घेतली हॅपी दिवाळी’ या आशयाचे ट्विट लेखक चेतन भगत यांनी केले. तसेच ‘फक्त हिंदूंच्या सणांवर बंदी का घालता?’ ‘ख्रिसमस असताना ख्रिसमस ट्री विक्रीवर आणि बकरी ईद असताना बकरीच्या विक्रीवर आणि तिचा बळी देण्यावर बंदी का घालत नाही?’ असेही प्रश्न चेतन भगत यांनी ट्विटद्वारे विचारले.

‘वर्षभरात फक्त एकदाच दिवाळीचा सण असतो. त्यावेळी फटाके नाही वाजवायचे तर मग कधी वाजवायचे?’ जे लोक रोज प्रदूषण पसरवतात त्यांचे काय?’ ‘काही लोक फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यात धन्यता मानतात. असे लोक मुक्या प्राण्यांचे बळी थांबवण्यात सक्रिय सहभाग का घेत नाहीत?’ असे प्रश्नही ट्विटरवर उपस्थित करत भगत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका केली.

चेतन भगत यांनी सुप्रीम कोर्टाच्या फटाके विक्रीच्या निर्णयावर टीका केल्यावर त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. ‘दिवाळी हा फटाक्यांचा नाही दिव्यांचा उत्सव आहे ठाऊक आहे का?’ ‘तुमची पुस्तके वाचणारे लोक चायनिज फटाके उडवून प्रदूषण पसरवतात’, ‘दिवाळी आणि फटाके यांचा तुम्ही जोडलेला संबंध चुकीचा आहे हा दिव्यांचा उत्सव आहे.’ ‘भगत तुम्ही अज्ञानी आहात का?’ ‘लहान मुलांच्या हातून फुलबाजी हिसकावून घेतली कारण त्यांना भविष्यात श्वास घ्यायला त्रास होणार नाही’ अशी उत्तरे देत नेटिझन्सनी चेतन भगत यांच्या प्रतिक्रियेवर टीका केली.

सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणामुळेच फटाक्यांवरच्या विक्रीचा निर्णय कायम ठेवला. दिवाळीनंतर प्रदूषणाची चाचणीही करण्यात येणार आहे. अशात सेलिब्रिटी लेखक चेतन भगत यांनी ट्विट करून अकारण वाद ओढवून घेतला.