छत्तीसगडमधील बिजापूर येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत संरक्षण दलाचे २२ जवान शहीद झाले असून ३१ जण जखमी झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये असिस्टंट कॉन्स्टेबल किशोर एंड्रिक यांचाही समावेश आहे. किशोर एंड्रीक शहीद झाल्याच्या वृत्तानंतर त्यांच्या पत्नीला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. कारण लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांच्या घरी पाळणार हालणार आहे, मात्र बाळाचा चेहरा पाहण्याआधीच पती किशोर यांच्या निधनाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान किशोर तिथेच असणारा आपला भाऊ हेमंतला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. हेमंतदेखील दुसऱ्या एका ग्रुपमधून नक्षलवाद्यांसोबत लढत होते. मात्र भावाला वाचवताना किशोर यांना आपले प्राण गमवावे लागले.

नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र – शहा

किशोर आणि रिंकी यांचा २००२ मध्ये लग्न झालं होतं. रिंकी सध्या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. किशोर यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. गावात किशोर यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, बेपत्ता कोब्रा कमांडोचं नक्षलवाद्यांकडून अपहरण?

तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. जवानांवर अचानक हल्ला केला. चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले.

चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश आहे. एक जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे.