गोरखपूरपाठोपाठ छत्तीसगडमधील रायपूरमध्येही प्राणवायूअभावी तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले असून रुग्णालयातील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत झोपून गेल्याने बालकांना प्राणवायूचा पुरवठा होऊ शकला नाही अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रायपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी रुग्णालय असून या रुग्णालयातील तीन बालकांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा करणारी यंत्रणा असून यासाठी एक ऑपरेटर नेमण्यात आला आहे. मात्र रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील ऑपरेटर झोपला आणि त्याचा हा निष्काळजीपणा तीन बालकांच्या जिवावर बेतला. तीन बालकांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा झाला नाही आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मुख्यमंत्री रमणसिंह यांनी सोमवारी सकाळी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ‘ऑपरेटरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत’ असे त्यांनी सांगितले. रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा नव्हता, ऑपरेटरमुळे ही घटना घडली असे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे बाबा राघव दास रूग्णालयात प्राणवायूचा पुरवठा नसल्याने ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली होती. ही घटना ताजी असतानाच छत्तीसगडमध्येही अशाच स्वरुपाची घटना घडल्याने आता राज्यातील भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे.