News Flash

बस्तरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा

नक्षलप्रभावित बस्तरमध्ये छत्तीसगड विधानसभेच्या ९० पैकी १२ जागा येतात. आगामी निवडणुकांसाठी येथे अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

| November 4, 2013 02:43 am

नक्षलप्रभावित बस्तरमध्ये छत्तीसगड विधानसभेच्या ९० पैकी १२ जागा येतात. आगामी निवडणुकांसाठी येथे अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सात जिल्ह्य़ांमध्ये ४० हजार किलोमीटरचा हा पट्टा असून, केरळपेक्षा त्याचे क्षेत्र मोठे आहे. गेल्या दोन्ही वेळा याच परिसराने भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत
केली. गेल्या निवडणुकीत भाजपने ११ जागा तर २००३ मध्ये १२ जागा जिंकल्या होत्या. मे महिन्यांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात राज्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांचा बळी गेला. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कळीचा बनला आहे. ही घटना लक्षात घेता राजकीय पक्षांनी या भागात प्रचार करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांचा विमा उतरवला आहे.
नक्षलवाद्यांनी मतदारांना बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे. बोटावर निवडणुकीची शाई दिसली तर बोट कापण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी बोटाला शाई लावू नये अशी मागणी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन आहे.
आयोगाने दुर्गम भागातील १६७ मतदान केंद्रे इतरत्र हलवली आहेत. दंतेवाडाच्या जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रत्येक ३०० मीटरला एक पोलीस गस्त घालत आहे. उमेदवारांना चोख सुरक्षा आहे. प्रचारात सुरक्षा यंत्रणांनी मार्गाबाबत दिलेले निर्देश काटेकोट पाळावेत असे सांगण्यात आले आहे. काँग्रेस दिवंगत नेते महेंद्र कर्मा यांच्या पत्नी देवती कर्मा या दंतेवाडा येथून रिंगणात आहेत. कर्मा कुटुंबातील पाचही जणांना देशातील सर्वोच्च सुरक्षा देण्यात आली आहे. आमचे काय होईल? मरण येईल अशी भावना महेंद्र यांचा तिसरा मुलगा आशीष यांनी व्यक्त केली आहे. राजकारणाच्या धकाधकीपासून दूर ते दिल्लीत शिक्षणासाठी गेले होते. मात्र आता प्रचारासाठी त्यांनी झोकून दिले आहे.
अभूतपूर्व सुरक्षा
सुरक्षा दलाच्या ५६४ तुकडय़ा बस्तरमध्ये आल्या आहेत. याखेरीज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०० तर छत्तीसगड सशस्त्र दलाच्या ६०, तर जिल्हा सशस्त्र दलाच्या १०० कंपन्या आहेत. एखाद्या ठिकाणची इतकी सुरक्षा ही अभूतपूर्वच असल्याचे भारतीय पोलीस सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सर्वाधिक अतिसंवेदनशील केंद्रे
 दंतेवाडाशेजारील बिजापूर येथील सर्व २३२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. अशी सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असलेला तो देशातील एकमेव मतदार संघ असावा. शेजारच्या सुकमा जिल्ह्य़ातील कोंटा मतदार संघातील १९३ मतदान केंद्रांपैकी १८२ अतिसंवेदनशील आहेत. बस्तर विभागात २६२९ मतदान केंद्रांपैकी केवळ ३०१ मतदान केंद्रे सर्वसाधारण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:43 am

Web Title: chhattisgarh assembly polls democracy comes to maoist heartland
Next Stories
1 राजस्थानमध्ये थाळीफेकपटू पुनियाला काँग्रेसची उमेदवारी
2 गोव्यातील नायजेरियन हे कर्करोगासारखे
3 निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी राहूल गांधीना हवा आठवड्याचा अवधी
Just Now!
X