फेसबुकवर सरकारविरोधी व्यंगचित्र पोस्ट केल्यामुळे छत्तीसगडमधील पत्रकाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर या व्यंगचित्रातून टीका करण्यात आली होती.

छत्तीसगडमधील कंकेर पोलिसांनी पत्रकार कमल शुक्ला यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम १२४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देशविरोधी कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राजस्थानमधील एका व्यक्तीने छत्तीसगड पोलिसांकडे कमल शुक्ला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण रायपूर सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केल्याची माहिती कंकेरचे पोलीस अधीक्षक के एल ध्रुव यांनी दिली. फेसबुकवर सरकार व न्यायव्यवस्थेवर टीका करणारे  व्यंगचित्र पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमल शुक्ला हे ‘भूमकाल समाचार’चे संपादक आहेत. बनावच चकमकींविरोधात त्यांनी सातत्याने लिखाण केले असून त्यांनी विविध राष्ट्रीय दैनिकांच्या वेबपोर्टलसाठीही लिखाण केले आहे. कमल शुक्ला यांनी फेसबुकवरुनच यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशातील सर्वच यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचा डाव आहे. विरोधी पक्षांसह लोकशाहीवर विश्वास असलेल्या अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. न्या. लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टावरच दबाव असेल तर ते व्यंगचित्र चुकीचे कसे आणि ते शेअर करणे हा देशद्रोह कसा ठरु शकतो, असा सवालही त्यांनी विचारला.

काय होते व्यंगचित्रात ?
कमल शुक्ला यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन ते वादग्रस्त व्यंगचित्र हटवण्यात आले आहे. मात्र, कमल शुक्ला यांनी फेसबुक पोस्टमध्ये व्यंगचित्रात काय होते, याचा उलगडा केला. त्या व्यंगचित्रात डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि हातात तराजू घेतलेली न्यायदेवतेची मुर्ती खाली पडलेली दाखवण्यात आली होता. मुर्तीचा एक हात सत्ताधाऱ्यांनी पकडल्याचे दाखवण्यात आले होते.