प्रचारसभेत राहुल गांधी यांचा विश्वास

झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि राज्यात बदल घडवून आणला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे एका जाहीर सभेत दिले.

छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यानंतर तेथील काँग्रेस सरकारने एका वर्षांत राज्यातील चित्र  बदलून टाकले आहे, छत्तीसगडमध्ये भाजपच्या राजवटीत आदिवासींकडून जमीन बळकावून ती उद्योगपतींना देण्यात येत होती, आम्ही आदिवासींच्या हिताचे वन हक्क कायद्याचे विधेयक आणले आणि भाजपचे चुकीचे काम थांबविले, टाटांकडून जमीन परत घेऊन ती आदिवासींना परत करण्यात आली आणि हे इतिहासात प्रथमच घडले, असे गांधी म्हणाले.

जेथे भाजपचे सरकार आहे तेथे उद्योगपतींना सहज जमीन मिळते, परंतु शेतकरी आणि आदिवासींना त्यांच्या मालास योग्य दर मिळत नाही, आम्ही काँग्रेसशासित राज्यांमध्ये कर्जे माफ केली आणि शेतमालास योग्य दर दिला, असेही ते म्हणाले. आदिवासींकडे पाणी, वन आणि जमीन आहे आणि या स्रोतांवरील त्यांच्या हक्कांचे काँग्रेस रक्षण करील, असेही गांधी म्हणाले.

छत्तीसगड आणि झारखंडमध्ये संपत्तीची वानवा नाही, परंतु सर्वसामान्य जनता आणि आदिवासी यांना त्याचा लाभ मिळत नाही, भाजप छत्तीसगडप्रमाणे झारखंची पिळवणूक करीत आहे, मात्र काँग्रेस यामध्ये बदल घडवून आणेल, असेही ते म्हणाले.